Tuesday, 3 August 2021

अवचित गड - अवचित गवसलेले सुखाचे क्षण

                 अवचित गड 


सभोवती गर्द हिरवाई, पूर्ण जंगलातून वर चढत जाणारी पायवाट, 1 तासाची चढाई, पावसाने केलेली निसर्ग सौंदर्याची लयलूट.., किल्ल्यावर जाताना येणारे पक्षांचे संगीत त्याला बाजूने खळखळत वाहणाऱ्या पाण्याची साथ..

वर चढून गेल्यावर अचानक दिसणारे किल्ल्याचे प्रवेशद्वार, थोडेसे लपवलेले गोमुखी बांधणीचे..ते ओलांडून आत गेल्यावर एक पडके द्वार व नंतर खूप मोठ्ठा तलाव..त्याकाळी किल्ल्यावर खूप लोक रहात असावेत ते सांगणारा..नंतर एक शंकराचे - पिंगळसई ग्रामदेवतेचे लहानसे देऊळ , पण नवीन बांधकाम केलेले आणि थोडे खाली उजव्या बाजूस उतरले कि पाण्याची टाकी. एकदम स्वच्छ वाहते पाणी  कदाचित पावसाळा असल्यामुळे.. पाण्याची चव अतिशय मस्त, मधुर.. सगळा शीण घालवणारी. तिथे एक छोटे देऊळ व दगडात कोरलेली तलवारधारी योध्याची प्रतिमा, ती बाजी पासलकर यांची आहे म्हणतात..तिथेच डावीकडे एक सुस्थितीत असलेली दरवाजाची कमान. तिथून पुढे गेल्यावर थोडे डावीकडे वर गेले कि एक पडका टेहळणी                                          बुरुज..असाच एक बुरुज किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आणि एकदम सुस्थितीत..

बुरुजावरून परत खाली येऊन थोडे पुढे जाऊन खाली उतरून गेल्यावर दोन डोंगरांना जोडणारा एक लाकडी पूल..हीच किल्ल्यावर येण्याची दुसरी वाट..

जेवण झाल्यावर पुन्हा परतीची तीच पण आता पावसाने निसरडी झालेली वाट..पुंन्हा गर्द हिरवाईत व पावसाच्या सरी झेलत गावात परत..

खूप वेगळा व निसर्गाजवळ घेऊन जाणारा अनुभव..

आता सुसाट ही एक family होत चाललीये त्याचा पुन:प्रत्यय या ट्रेक मध्ये आला..


©आशुतोष 

Sussat Rebel on Wheels

Website - sussat.co.in

PC - Makarand Bedekar