नैनिताल बिनसर - सुसाट हिमालय निसर्ग भ्रमंती
नैनिताल-बिनसर दौऱ्यावरून येऊन 2-3 दिवस झाले पण मन मात्र अजून तिथेच रेंगाळतय..
ते उंच उंच वृक्ष, घनदाट जंगल, वळणा वळणाचे रस्ते, दुरून दिसणारी बर्फाच्छादित अगणित शिखरे..नयना लेक आणि प्रचंड थंडी..खरंच अविस्मरणीय..
जेव्हा हिमालयात जातो तेव्हा मुंबई-पुण्याच्या मंडळींना मोठा प्रवास अनिवार्य..पण थोडा त्रास झाला तरी आपण जेव्हा हिमालयाच्या कुशीत शिरतो तेव्हा मात्र थकवा शीण कुठल्याकुठे पळून जातो..त्या थंड वाऱ्याच्या झुळुकींनी मन प्रफुल्लित होते..
असेच झाले नैनिताल मुक्कामी पोहोचल्यावर..सुंदर टुमदार घर..नाताळ साठी सजवलेले..बाहेर मोठ्ठी गच्ची..आत जाण्याआधीच सर्वांची फोटोग्राफी तिथे सुरू झाली..काहीजण विडिओ कॉल वरून घरच्यांना घर दाखवू लागले..
इथे तीन दिवस मुक्काम, खाण्या-पिण्याची रेलचेल..नैनिताल भटकंती, लेक मध्ये बोटिंग,किलबरी आणि पंगोट येथील पक्षी दर्शन, टिफिन टॉप ला छोटा ट्रेक आणि प्रचंड खरेदी..
काही जणांना घेतलेले सामान ठेवण्यासाठी बॅगेची खरेदी पण करावी लागली..
रात्री रंगलेली गप्पांची मैफिल आणि कराओके ची गाणी..सगळेच भारी..
बिनसर जवळ तीलारी गावातील होम स्टे जरा वेगळा..गावापासून, शहरापासून दूर आणि हटके..
अतिशय सुंदर व कलात्मक बांधलेले घर..तीन मोठया खोल्या, त्यातील वरच्या दोन खोल्यांना पोटमाळा, खाली किचन व पुढे मोठ्ठे लॉन..रात्री अंगणात शेकोटी..सगळे स्वप्नवत..
मग एक दिवस जागेश्वर महादेवाचे दर्शन, एक दिवस जंगल भटकंती..तिथे रात्री शेकोटीजवळ बसलो असताना गावकऱ्यांनी सांगितले कि गावात बिबट्या आला होता..आणि मग सगळे आपापल्या खोलीत गपगार..रात्री बिबट्याची स्वप्नं..आणि भास..
आणि ट्रिप संपली पण बघता बघता..मग परतीचा प्रवास..काठगोदामला चक्क 'उडपीवाला' नावाचे हॉटेल आणि उडपी डोसा, इडलीवडे असा मेनू...पंजाबी फूड खाऊन कंटाळा आलेल्या जीव्हेला थोडा दिलासा..
मग प्रवास..प्रवास करीत घरी परतलो..
आणि आता पुढच्या वेळी डिसेंबरमध्ये कुठे जायचं याचा विचार सुरू पण झालाय..पण ट्रीपला बरोबर मात्र आताचे सर्वजण मात्र हवेत हं !
© आशुतोष
Team Sussat