Saturday, 28 March 2026

आनंदाचे डोही आनंद तरंग

 आनंदाचे डोही आनंद तरंग

काल सुसाट चा 157 वा पद्मदुर्ग चा इव्हेंट मस्त झाला..35 पेक्षा अधिक सहभागी..सर्व विविध वयोगटातले..

सुसाट ग्रुप सुरू केला 2010 साली..तेव्हा सुरवातीला children's camp केले..तेव्हा लहान मुले आणि कॉलेज च्या मुलांची उपस्थिती लक्षणीय असायची..आम्ही लीडर पण 40-45 वयोगटातील होतो..त्यामुळे मुले लवकर कनेक्ट व्हायची. त्यांची, तरुणांची भाषा बोलली की ते म्हणायचे अरे..हे लीडर पण आपल्या सारखेच. 

पण आता हीच नेहमी ट्रेक ला येणारी पिढी शिक्षण घेऊन नोकरीला लागली..तिथल्या AC corporate culture मध्ये हरवून गेली.. कार, बाईक किंवा कंपनीच्या बस ने ऑफिस ला जाऊ येऊ लागले..hardship ची सवय मोडली..उन्हात फिरणे हा त्रास वाटू लागला..ट्रेक पेक्षा जीम ला जाणे हे प्रेस्टिज बनले.

आम्ही किंवा आमच्याहून ही वयस्कर ट्रेकर जे किल्ले, गड सहज सर करतात तिथे ही तरुण मंडळी हाफ हूफ करू लागले. त्यांना ट्रेकिंग ही मौज न वाटता त्रासदायक प्रकार वाटू लागला..आनंद कमी झाला की त्याचा परिणाम ट्रेकिंग न करणे किंवा luxury ट्रेकिंग करणे असा दिसू लागला..अनेक ट्रेकिंग क्लब नी मागणी तसा पुरवठा या तत्वांनी लक्झरी ट्रेक आयोजित करायला सुरवात केली..पण ट्रेकिंग म्हणजे चालणे आलेच. सर्व सुखसोयी, मनपसंत जेवण, झोपायला छान टेन्ट, बेड, भरगच्च नाश्ता, पिझ्झा, बर्गर, पास्ता,  ब्रेड आम्लेट वगैरे मस्त लक्झरी असली तरी चालावे लागणारच दिवसभर..ते पण कमी कमी केले..टप्पे छोटे करून..पण तरुणाईचे ट्रेकिंग चे आकर्षण कमी कमी होत गेले. आता बऱ्याच ग्रुपचे average age 35-40 झाले आहे..

तर हे आनंद देणे, घेणे हा वसा सुसाट ने उचलला..ट्रेक बघता बघता भरू लागले. येणारे व्यक्तिगत दुःख, क्लेश विसरून या आनंदाच्या प्रवाहात सामील झाले. ट्रेक/ ट्रीप मध्ये कुठेही घाई नाही, जास्त कठीण चढाई नाही आणि गप्पा गोष्टी करत खात - पीत ट्रेकिंग. हे सर्व वयोगटांना भावते आणि सर्व ग्रुप एक कुटुंब बनून जाते. सध्याच्या जीवनशैली मुळे आई वडिलांचे मुलांशी बोलणे खूप कमी झाले आहे. मोठी कुटुंब नाहीत, घरात मोठी माणसे नाहीत खरंतर 


या पिढीची ही गरज आहे..आई वडील वेळ देऊ शकत नाहीत पण मुलांनी मागितलेल्या वस्तू, महागडे मोबाईल देऊन ते त्याची भरपाई करायला बघतात..पण मुलांना निसर्गात नेणे, त्यांची मने रिकामी करून त्यात आनंद भरणे, लहान लहान गोष्टीतून आनंद कसा मिळवायचा हेच तर सुसाट करतेय..त्यामुळेच आमच्या बरोबर आलेले लहान लहान सहभागी पण जेव्हा असे म्हणतात की आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये खूप एन्जॉय केले आणि आता नेहमी तुमच्या सोबतच येणार की हे जाणवते की आपण योग्य मार्गाने चाललोय आणि उर आनंदाने भरून येते..

Friday, 13 March 2026

आये बहार बनके, लुभाकर चले गये...

 आये बहार बनके, लुभाकर चले गये...

 


 

आये बहार बनके लुभाकर चले गये...
अशीच काही अवस्था वाघीण एक्स मार्क ला बघितल्यावर झाली..

कऱ्हांडला वन संरक्षित क्षेत्रात (नागपूर जवळ) आदल्या दिवशी सकाळी सकाळी एक्स मार्क ची दोन पिल्ले सती जलाशया जवळ सावलीत/जाळीत बसलेली दिसली होती. एक मेल, एक फिमेल..साधारण 16 ते 18 महिन्यांची..अजून एक मेल बछडा आम्हाला दिसला नाही तो विरुद्ध दिशेला गेला..रस्त्यावरून चालत गेलेला मेल पूर्ण वाढ होत आलेला होता..10-12 फूट लांब..अजून 6-8 महिन्यात त्यांची आई (एक्स मार्क) त्यांच्यापासून वेगळी होईल किंवा बछडे तिच्यापासून वेगळे होतील..सध्या पिल्ले वेगळी राहतात पण एक्स मार्क त्यांना प्रोटेक्ट करते आणि शिकार करून खायला देते..त्यामुळे तिचाही वावर पिल्लांच्या आजुबाजूला असणार हा अंदाज होताच पण त्या दिवशी ती नाही दिसली.
दुसऱ्या दिवशी खूप अपेक्षेने लवकर सहा वाजताच जंगलात शिरलो..तडक सती जलाशयाजवळ पोचलो..कालचे बछडे तरी नक्की तिथे असतील अशी खात्री असल्याने सर्व जीप तिथेच होत्या..पण बछडे नव्हतेच..सर्वजण कानोसा घेत काही जंगल कॉल येतायेत का बघत होते. तासभर काहीच नाही..सर्व जीप इतस्ततः विखुरल्या. आम्ही माघारी येऊन एक दोन पाण्याचे स्पॉट चेक केले.. पगमार्क दिसतात का ते पाहिले..तेव्हा दूर थोडे जंगल कॉल होते पण ते खूप लांब होते..आम्ही एक पाण्याचा स्पॉट शोधून रस्त्यावर थांबलो..सकाळची थंड हवा आणि लवकर उठल्यामुळे डोळ्यावर पेंग होती..काहीजण झोपले पण..अर्धातास थांबून सती कुटी ला जाऊन फ्रेश होऊ, आणलेले स्नॅक्स खाऊ असे ठरले..
अर्ध्यातासाने निघालो.. काल जिथे बछडे दिसले तो पॅच ओलांडला..रस्ता संपत होता तिथे एक जीप आमच्या दिशेला तोंड करून उभी होती..त्यांनी खुणेने सायटिंग नाही असे सांगितले..आम्ही डाव्या बाजूने छोट्या वाटेने सती कुटी कडे जायला वळलो..दोन वळणे पार केली आणि तिसऱ्या वळणावर ...एक प्रचंड मोठे, देखणे पट्टेरी जनावर आडवे आले..डोळे विस्फारले.. श्वास थांबला..तो क्षण किती डोळ्यात साठवू असे झाले..पण ते जनावर रस्ता ओलांडून उजवीकडे जंगलात शिरले पण..जीप ड्रायव्हर ने प्रसंगावधान दाखवून गाडी रिव्हर्स घेऊन पुन्हा मेन रस्त्यावर आणली..आम्ही उभ्या असलेल्या जीप ला वाघ येतोय अशी खूण केली..आणि पुन्हा एकदा वाघिण डाव्या बाजूने रस्त्यावर अवतीर्ण झाली. आता मात्र कॅमेरे सरसावले गेले.. छान फोटो मिळाले.. मग मात्र डोळ्यांनीच सर्व दृश्य साठवून घेतले..काय चाल..काय रुबाब..वाघिणीला tigress म्हणतात तो तिचा ग्रेस बघून म्हणत असतील का? ती उजव्या दिशेला जंगलात शिरून दिसेनाशी झाली पण..नंतर गाईड ने सांगितले ती एक्स मार्क होती..त्या बछड्यांची आई. तिच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला X-Mark आहे तो आम्ही उजव्याबाजूला असल्यामुळे दिसला नाही फोटोतही आला नाही. असो..
दुपारच्या राईडला पावनी वन संरक्षित क्षेत्रात देखील नशिबाने साथ दिली आणि जलविहार करणारा पूर्ण वाढ झालेला वाघ (अजून नाव ठेवले नाहीये.. न्यू मेल म्हणतात) दिसला..जवळ जवळ 15 मिनिटे डुंबून तो जंगलाच्या दिशेने गेला..जरा दूर होता पण दरारा आणि शान राजाचीच होती..

एकंदरीत प्राणी व पक्षी बरेच दिसले या ट्रिपमध्ये पण मनावर कोरले गेले ते मात्र वाघ दिसले ते क्षण..निव्वळ अविस्मरणीय..
आशुतोष

Photos by Dr.Nikita Bhot