Sunday, 19 July 2026

सच पास - सुस्साट

 

सच पास सुस्साट

नऊ दऱ्या, असंख्य धबधबे आणि हिमालयाच्या कुशीतला अविस्मरणीय प्रवास



"प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसते; तो स्वतःला नव्याने सापडण्याचा अनुभव असतो."
या प्रवासाने याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिला.

मनालीहून सोलांगमार्गे अटल बोगदा पार करत आमचा २४ जणांचा "सुस्साट ग्रुप" सिसूकडे निघाला. सच पास मोहिमेची तयारी फेब्रुवारीपासून सुरू होती. २५ जून रोजी देशाच्या विविध भागांतून आलेले आम्ही सर्वजण सुंदरनगर येथे एकत्र आलो आणि तिथून या रोमांचकारी प्रवासाला सुरुवात झाली.

अटल बोगद्यानंतर रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती. पुढे अनेक पगले नाले भेटणार याची कल्पना होतीच, पण त्याची पर्वा कुणालाच नव्हती. कारण हिमालयातील फारसे परिचित नसलेले, पर्यटकांची गर्दी नसलेले हे दुर्गम क्षेत्र आणि नऊ दऱ्यांमधून दिसणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात होती.

संध्याकाळी आम्ही सिसूला पोहोचलो. हॉटेलसमोरच निळाशार तलाव आणि त्याच्या शेजारी कोसळणारा धबधबा... संध्याकाळ त्याच ठिकाणी निवांत घालवली. मग काय... फोटो, सेल्फी आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद!

दुसऱ्या दिवशी उदयपूरच्या दिशेने निघालो आणि पगला नाला म्हणजे नेमके काय, याची पहिली झलक मिळाली. एका ठिकाणी पूल वाहून गेला होता. वाहतूक तात्पुरत्या कच्च्या मार्गाने सुरू होती. आमच्या तीनही टेम्पो ट्रॅव्हलर्सनी तो प्रवाह सुरक्षित पार केला आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

खरे तर आमचा मुक्काम ऊर्गोस येथे होता. पण उदयपूरमध्ये जेवण करून पुढे गेल्यावर पुन्हा एक पगला नाला आडवा आला. उन्हाळ्यात वितळणाऱ्या हिमनद्यांमधून अचानक वाढणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला स्थानिक भाषेत पगला नाला म्हणतात. अनेक ठिकाणी बीआरओने पूल बांधले असले तरी काही ठिकाणी पाणी थेट रस्त्यावरूनच वाहत असते. तो प्रवाह पार करणे अशक्य असल्याने आम्हाला परत उदयपूरला यावे लागले.

उदयपूर हे छोटेसे गाव. एक प्राचीन देवीचे मंदिर, काही होमस्टे आणि मोजकेच ढाबे... एवढेच. दुसऱ्या दिवशी पुन्हा ऊर्गोस गाठण्याचा प्रयत्न केला, पण निसर्गापुढे माणूस हतबलच! अखेर मियार व्हॅलीचा बेत रद्द करून पुढील प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला.

एका दिवसाचे बुकिंग वाया गेले होते, दुसऱ्या दिवसाचेही जाणार होते. सगळ्यांच्या मनात काळजी होती—आता पुढे काय? पुन्हा असेच नाले आडवे आले तर? तरीही उदयपूरमध्ये वेळ न घालवता आम्ही पांगी व्हॅलीच्या दिशेने निघालो.

रस्ते अतिशय खराब, मोबाईल नेटवर्क अधूनमधूनच आणि त्यात पावसाची भर. एका छोट्याशा गावात गरमागरम नूडल्स, मोमोज आणि चहाने थंडी घालवली. २४ जणांसाठी राहण्याची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान होते. शेवटी "चंद्रभागा" नावाच्या हॉटेलमध्ये मुक्काम मिळाला. वीजेचा थोडा प्रश्न होता, पण त्या परिस्थितीत तोच मोठा दिलासा होता.

दुसऱ्या दिवशी हुडोन बटोरीकडे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विविधरंगी रानफुलांचा बहर पाहून गाड्या थांबवल्याच गेल्या. मग क्लिक... क्लिक... क्लिक... नुसते फोटोसेशन!

हॉटेलवर पोहोचून जेवण आणि थोडा आराम केला. जवळच असलेल्या एका नयनरम्य तलावाकडे छोटासा ट्रेक केला. तलावाशेजारच्या टेकडीवर बसून आजूबाजूचा शांत निसर्ग अनुभवताना वेळ कसा गेला तेच कळले नाही. परतताना कोणीतरी भजी आणि चहाचे आमिष दाखवले होते. त्यामुळे सगळे भराभर परतले; पण ना भजी, ना चहा! मात्र रात्रीचे जेवण अप्रतिम झाले.

त्या रात्री पौर्णिमा होती. हॉटेलच्या बाल्कनीतून दिसणारी चांदण्यात न्हालेली पांगी व्हॅली डोळ्यांत कायमची साठून राहिली.

पुढचा मुक्काम सुरोल बटोरी येथे होता. आमच्या होमस्टेसमोरच एक भव्य धबधबा दिसत होता. संध्याकाळी सगळे तिकडे निघालो. धबधबा जवळ दिसत असला तरी प्रत्यक्षात बराच दूर होता. मध्येच एक ओढा पार करावा लागला. आमचे लीडर्स गारठलेल्या पाण्यात उभे राहून प्रत्येकाला सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला पोहोचवत होते. धबधब्यापर्यंत जाता आले नाही, पण तो अनुभव अविस्मरणीय ठरला.

आता सगळ्यांच्या प्रतीक्षेचा दिवस उजाडणार होता—१४,५०० फूट उंचीवरील सच पास!

सकाळी वातावरण ढगाळ होते. नाश्ता करून दुसऱ्या दरीत प्रवेश केला. कच्चे, वळणावळणाचे रस्ते... अनेक ठिकाणी डोंगर फोडून तयार केलेला मार्ग... समोरून वाहन आले की कोणीतरी मागे जाऊनच पासिंग! पावसामुळे रस्ता अधिकच निसरडा झाला होता.

आणि अचानक नजरेसमोर एक अप्रतिम दृश्य उभे राहिले. प्रचंड उंचीवरून कोसळणारा धबधबा... पण त्याचे पाणी रस्त्यावर न पडता पुढे खोल दरीत झेपावत होते. आमच्या गाड्या त्या धबधब्याखालून गेल्या. तो रोमांच शब्दांत मांडणे अशक्य आहे.

सच पासच्या दिशेने उंची वाढत गेली तसे दोन्ही बाजूंना बर्फ, खाली दऱ्यांमध्ये पसरलेला बर्फ, असंख्य धबधबे आणि ढगांच्या साथीने नटलेला हिमालय... डोळे भरूनही मन भरत नव्हते.

थोड्याच वेळात एका विशाल बर्फाच्छादित मैदानावर पोहोचलो. एखादा गोठलेला तलावच जणू! त्यानंतर डावीकडे वळत आम्ही अखेर सच ज्योत (सच पास) येथे पोहोचलो.

लहानशा टेकडीवर देवीचे मंदिर, फडकणारे झेंडे आणि सर्वत्र शुभ्र बर्फ. दर्शन घेतल्यानंतर सगळ्यांनी बर्फावर मनसोक्त फोटोसेशन केले. त्या क्षणी आम्ही ढगांच्या वर उभे होतो आणि ढग आमच्या खाली वाहत होते.

"याचसाठी केला होता अट्टाहास!"

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच समाधान झळकत होते. तिथून निघावेसे कुणालाच वाटत नव्हते. पण वेळेचे बंधन होते.

वाटेत नूडल्स आणि ऑम्लेटचा साधासुधा पण चविष्ट बेत झाला. पुढे जम्मू सीमेजवळ मिलिटरी तपासणी झाली. सर्वांचे आधार क्रमांक नोंदवले गेले. त्यानंतर आम्ही बैरागड येथील "मन्नत" हॉटेलमध्ये पोहोचलो. समोर हिरवीगार दरी आणि प्रत्येक खोलीचे वेगळे आकर्षक इंटेरियर.

दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये प्रवेश करत आम्ही गमगूल-सियाबेही वन्यजीव अभयारण्यातून पुढे निघालो. घंटेसारख्या आकाराची विविधरंगी रानफुले संपूर्ण दरीत बहरली होती. हलक्या पावसातही फोटो काढण्याचा मोह कुणालाच आवरला नाही.

पुढे पाद्री पास येथे पोहोचलो. काही जण गरमागरम चहाचा आस्वाद घेत होते, तर काही निसर्गात हरवले होते. शुद्ध दुधाचा चहा आणि बाजूलाच बनणाऱ्या ताज्या खव्याची चव आजही जिभेवर रेंगाळते.

शेवटचा डोंगरातील मुक्काम बदरवाह येथे झाला. वेळेअभावी तेथील मंदिरे आणि किल्ला पाहता आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून अखेर संध्याकाळी अमृतसरला पोहोचलो.

सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर आणि अमृतसर दर्शन करून परतीचा प्रवास सुरू झाला. मुंबई, पुणे, चेन्नई आणि इतर शहरांकडे आम्ही परतलो...

...सोबत घेऊन आयुष्यभर जपाव्यात अशा असंख्य आठवणी.

© आशुतोष


No comments:

Post a Comment