Thursday, 11 September 2014

सुसाट सफर - लेह लडाखची

सुसाट सफर - लेह लडाखची

              साधारण २ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा मुलगा त्याच्या मित्रांबरोबर मोटरसायकल वरून लेह -लडाख टूर करून आला. त्याचे फोटो पाहत असताना तो सांगत होता, हाच तो जगातील सर्वात उंच गाडी रस्ता ( Highest Motorable Road ) खारदुंग ला. (खिंडीला लडाखी भाषेत 'ला' म्हणतात आणि तलावाला 'Tso'.) उंची १८३८० फुट. त्याचे ते फोटो बघताना हे नक्कीच जाणवत होते कि हा रस्ता, लेह - लडाख सुंदर असले तरी दुर्गम आहे. तिथे जाणे अवघड आहे आणि कितीही इच्छा असली तरी आपल्या वाढत्या वयात तेथे जाणे अशक्य आहे.


आणि आता या क्षणी मी देखील माझ्या पतीसोबत याच खारदुंग ला टॉप  वर उभी आहे. उर अभिमानाने, राष्ट्रप्रेमाने भरून आलाय, श्वास धपापतोय, पण तो चालण्यामुळे नव्हे तर विरळ हवेमुळे. माझ्या बरोबर आलेल्या २३ जणांच्या भावना देखील साधारण अशाच …आणि हि अशक्यप्राय गोष्ट शक्य झालीय ती 'सुसाट' या ग्रुप मुळे.


साधारण मार्च - एप्रिल मध्ये माझ्या मुलाने मला विचारले कि 'सुसाट' चे आशु-विनय दरवर्षी प्रमाणे ऑगस्ट मध्ये लेह-लडाख टूर आयोजित करतायत, तुमची इच्छा होती न जायची?  मी विचारतो त्यांना …. !
सिनियर सिटीझन करू शकतील ना हि टूर ? विरळ हवेचा काही त्रास तर नाही होणार ना  ? असे अनेक विचार डोक्यात यायला लागले. 'सुसाट' च्या विनय शी बोलणे झाल्यावर समाधानकारक उत्तरे मिळाली व आमचा जाण्याचा बेत नक्की झाला व आमची विमानाची तिकिटेही मुंबई - श्रीनगर बुक झाली. 
लेह -लडाख परिसर हा जम्मू काश्मीर राज्यात येतो. जम्मू - काश्मीरची कारगिल व लडाख अशा दोन प्रांतात (जिल्ह्यात) विभागणी केली आहे. लेहला रस्त्याने जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मनाली-केलॉग-सारचू -पांग-उपशी- लेह. हा मार्ग मोटरसायकल ने जाणा-याना चालेन्जिंग वाटतो त्यामुळे सहसा बायकर्स या मार्गाने लेह गाठतात. तर दुसरा मार्ग श्रीनगर -द्रास -कारगिल -लामायुरू - लेह. हे दोन्ही मार्ग लेह येथे मिळतात. हा दुसरा मार्ग तुलनेने सोपा आहे व येथे landslide चा धोका थोडा कमी असल्याने आपण या मार्गाची निवड केली आहे. आम्ही निघण्याच्या आधी सर्व टूरला जाणा -या सहभागींची जी सभा झाली त्यात ही  माहिती आयोजक देत होते. एकूण मोहिमेत २० जण सहभागी होणार होते. साधारण वयोगट हा २० ते ६० असा होता व त्यात साधारण ६ कपल्स होती. हे सर्वजण मुंबई - पुणे - अहमदनगर येथील रहिवासी होते. आमच्या सर्व शंकांचे निरसन, high altitude sickness होऊ नये म्हणून घ्यायची काळजी व अगदी कायकाय बरोबर घ्यायचे व ते कसे bag मध्ये / havor sack मध्ये भरायचे याचेही मार्गदर्शन केले. आणि आमचा उत्साह प्रचंड वाढला. आम्ही सर्व तयारी करून निघण्याच्या दिवसाची वाट बघू लागलो.
                  विमानाने थेट श्रीनगर गाठल्यावर तेथे आयोजक व आमच्या टेम्पो traveler आमची वाटच बघत होत्या . सर्वजण वेगवेगळ्या फ्लाईट नी आलो तरी एकत्रच श्रीनगर हॉटेलवर पोहोचलो. तो दिवस श्रीनगर भटकंती, दल लेक, शिकारा सैर व शॉपिंग मध्ये संपला देखील. दुस-या दिवशी सकाळी लवकर सोनमर्ग मार्गे कारगिल गाठायचे होते. सोनमर्ग ला भरपेट नाश्ता झाला. तेथून पुढेच खूप अवघड असा झोझिला (पास) होता आणि लहरी निसर्गामुळे ३-४ तास झोझिला घाटात खोळंबा झाला. Landslide  झाल्याने B.R.O. - JCB ने माती दूर करत असताना गाड्यांच्या लांबचलांब रांगा घाटात लागल्या.
अर्थात ते ३ - ४ तास आम्ही सार्थकी लावले. राखी पोर्णिमा दुस-याच दिवशी होती. आम्ही त्या रांगेत उभ्या असलेल्या मिलिटरीच्या ताफ्यातील जवानांना राख्या बांधल्या. पुढे द्रास ला 'विजय पथ' हे कारगिल विजयाचे स्मारक व म्युझियम पहिले. जवानांना भेटलो. उर अभिमानाने भरून आला. सर्व जवानांना व त्यांच्या शौर्याला सलाम करून , रक्षाबंधन करून कारगिल मुक्कामी थोडे उशीराच पोहोचलो. सोनमर्ग सोडल्यावर झोझिला (पास) नंतर जाणवलेली एक गोष्ट म्हणजे हवेत जाणवणारा फरक, श्वास घेताना विरळ हवेमुळे होणारा थोडासा त्रास आणि निसर्ग सौंदर्यात झालेला आमुलाग्र बदल. सोनमर्ग पर्यंत हिरवाईने नटलेले डोंगर नंतर उघडे बोडके झाले आणि सर्वत्र वाळूंचे विविधरंगी पर्वत दिसू लागले.
                 कारगिल नंतर चा दिवस होता राखी पौर्णिमेचा . तो दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला तो टूर आयोजकांच्या आयडियेच्या कल्पनेमुळे. आम्ही सकाळी निघालो ते सर्वजण पोहोचलो LOC वरील जवानांच्या एका कॅम्प वर. तेथे आमचे जोरदार स्वागत झाले.
सजवून ठेवलेले ओवाळायचे तबक व त्यात सुंदर राख्या ठेवल्या होत्य. आम्हाला बसण्यासाठी एक शामियाना उभारला होता. आणि त्यानंतर एक सुंदर राखीपौर्णिमेचा - रक्षा बंधनाचा कार्यक्रम सुरु झाला. आम्ही सर्व जणींनी उपस्थित जवानांना ओवाळून त्यांना राख्या बांधल्या. जवानांच्या चेहे-यावरील आनंद तर ओसंडून वाहत होता आणि आमच्या मनात होता भावनांचा कल्लोळ. या सर्व प्रसंगाचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य. पण एक मात्र नक्की कि हि राखीपोर्णिमा आमच्या मनावर कायमची कोरली गेली.
येथे येणा-या सर्व पर्यटकांना हेच सांगणे आहे कि शक्य असेल तर LOC वरील मिलिटरी  कॅम्प ला अवश्य भेट द्याच ( यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असते) येथे तुमचे नक्कीच स्वागत होईल.
या नंतरचा मुक्काम अल्ची या गावी होता. तेथे बुद्ध मंदिर व एक धरण आहे. रहायला हे ठिकाण नितांत सुंदर आहे. पुढील दिवशी आम्ही लामायुरू ही मोनास्टरी व पत्थरसाहिब हि दोन ठिकाणे पाहून लेह ला पोहोचलो. लामायुरू या मोनास्टरी समोरील डोंगर व त्यावरील वेगळ्या रंगाची माती / वाळू चंद्रभूमी   सारखी दिसते म्हणून याला Moonland असेही म्हणतात. पत्थर साहिब हा शीख धर्मियांचा गुरुद्वारा असून येथे डोके टेकवल्या खेरीज भारतीय सेनेची एकही गाडी तसेच एकही पर्यटक पुढे जात नाही. वाटेत जाताना एक Magnetic हिल नावाचे आश्चर्यकारक ठिकाण लागते. या डोंगरावर  चुंबकीय भार आहे त्याचा परिणाम धातूंच्या वस्तूंवर होतो व त्याचे प्रात्यक्षिक देखील आमच्या गाडीवर झाले...
            आणि बघता बघता - लेह मध्ये आपले स्वागत असो - अशा कमानीने आमचे स्वागत केले. लेह मध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला दिसते ते 'हॉल ऑफ फेम' हे लष्कराने बांधलेले वॉर म्युझियम. येथे लेह चा संपूर्ण इतिहास व आजपर्यंत या परिसरात झालेल्या युद्धांचा समग्र इतिहास मांडला आहे तसेच  या युद्धांमध्ये शहीद झालेल्या वीरांचे फोटो व त्यांचे एक भव्य स्मारक उभारले आहे. येथे युद्धात वापरण्यात आलेली शत्रूसैन्याकडील  युद्धसामग्री प्रदर्शित केली आहे तसेच सियाचीन या अतिशय दुर्गम भागातील अति उंचीवरील चौकीवर रहाणा-या सैनिकांबद्दलची संपूर्ण माहिती देणारे एक दालन आहे. 
         लेह हे अतिशय सुंदर शहर असून तिथून दूर दूर हिमाच्छादित शिखरांचे मनोहारी दर्शन होते. हे शहर थंडीमध्ये पूर्ण बर्फाच्छादित असते.  लेह हे  समुद्रसपाटी पासून ११५०० फुट उंचीवर असून येथुन पुढील प्रवास त्याहून जास्त उंचीवरून आम्हाला करायचा होता. लेहला पोचल्याच्या दुस-याच दिवशी १८३८० फुटांवरील खारदुंग ला  पार करून आम्ही नुब्रा valley त प्रवेश केला. डेस्कीट या गावी ओपन बुदद्धा ही अतीभव्य, जवळ जवळ ४ मजली उंच बुद्धाची मूर्ती बघून आम्ही हुंडर या ठिकाणी मुक्कामाला पोहोचलो.
हुंडर या ठिकाणी चक्क राजस्थान सारखे वाळवंट व SAND DUNES बघायला मिळतात. येथेच ते दोन वशिंड (Double Hump) वाले उंट आहेत. या उंटावरील   आनंदी  सफरीने या दिवसाची सुंदर सांगता झाली. पुढील दिवशी जर जास्त प्रवास होता. आम्ही वारीला मार्गे थेट पेंगोंग या ठिकाणी जाणार होतो त्यामुळे सकाळी लवकर निघालो. साधारण संध्याकाळी ४ वाजता पेंगोंग लेकचे प्रथम दर्शन घडले. हा लेक प्रचंड मोठा असून त्याचा फक्त एक तृतियांश भाग भारतात तर दोन तृतीयांश भाग चीन मध्ये आहे. या लेक मध्ये दिसणा-या निळ्या - हिरव्या रंगांच्या अनेकविध छटा हे याचे वैशिष्ट्य. हा लेक दिसल्यावर सर्व जणांमध्ये विशेषत: फोटोग्राफर्स मध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि लेकची व माणसांची विविध छायाचित्रे कॅमे-यात बंदिस्त झाली. 
             येथून पुढील प्रवास हा लेह मार्गे मनालीच्या दिशेने तसा परतीचा प्रवास म्हणता येईल. परत जाताना लेह जवळील मोनास्ट्रीज, शे palace, सिंधू घाट , रांचो ची शाळा ( ३ इडियट फेम ), झोरावर palace , या सर्वांना भेट देऊन सो मोरीरी व सो कर हे थोडे आडवाटेला असलेले लेक बघितले. सो मोरीरी ला कडाक्याच्या थंडीचा व टेन्ट मधील मुक्कामाचा अनुभव जरा  हटकेच. नंतर  पांग ,सारचू करत केलोंग येथे मुक्काम व रोहतांग वरून मनाली. हा रस्ता तसा अवघड, खडतर पण बरोबर च्या मंडळींमुळे, अंताक्षरी खेळत, गाणी म्हणत, गप्पा मारत व निसर्ग सौंदर्य न्याहाळत सुकर झाला. लेह ते मनाली या भागातील निसर्गाचे एक वेगळेच सौंदर्य आहे हे पर्वत थोडे रौद्रभीषण आहेत आणि इथला निसर्ग  थोडा लहरी देखील आहे. 

             आणि मनालीत आल्यावर चक्क आपल्या घरीच पोहोचल्याची भावना मनामध्ये जागृत झाली. एवढा खडतर प्रवास निर्विघ्नपणे पार पाडला म्हणून देवाचे आभार मानले. अर्थात यात सर्वात मोठा वाटा नियोजनाचा. अतिशय शिस्तबद्ध व खेळीमेळीच्या वातावरणात चाललेला हा प्रवास. सुंदर हॉटेल्स, टेन्टस, चविष्ट नाश्ता , जेवण, सहभागींना काहीही कमी पडू न देण्याचे आयोजकांचे प्रामाणिक प्रयत्न यामुळेच मी व माझे पती ही  सहल यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो. पुन्हा अशाच सुंदर टूरला भेटण्याचा निश्चय करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. 

सौ. अनिता ओक 

लेखिका या मुंबई महानगर पालिकेतून निवृत्त झाल्या असून सध्या तळेगाव येथे स्थायिक आहेत. 
सदर लेखात वापरलेले फोटो टूर दरम्यान काढले असून ते कविता जोशी, आशुतोष साळवेकर, रौनक राजे यांचे आहेत.

सदर टूर 'सुसाट रिबेल ऑन व्हील्स' या ग्रुप ने दिनांक  ८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०१४ या कालावधीत आयोजित केली होती व त्यात एकूण २४ जण सहभागी झाले होते.  


                                          
                   




No comments:

Post a Comment